औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीत काँगे्रस पक्षाने इच्छेविरुद्ध औरंगाबाद लोकसभा मतदार संघात उमेदवार दिल्याने काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. आ. सत्तार यांच्यासोबत अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायतीचे सरपंच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने काँग्रेस पक्षाला औरंगाबाद जिल्ह्यात मोठे भगदाड पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने देशभरात घवघवीत यश मिळवित काँग्रेस पक्षाची दाणादाण उडविली. औरंगाबाद जिल्ह्यात तर पक्षाला उमेदवारीपासून पक्षांतर्गत वाद सुरू झाला. त्याचा शेवट जिल्हाध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांचा काँग्रेस परतीचा मार्ग बंद झाला. पक्ष सोडल्यानंतर राजकीय भवितव्याच्या शोधात आ. सत्तार असताना त्यांनी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संधान साधले.
विखे पाटील हे काँग्रेसच्या काही आमदारांसोबत भाजपात प्रवेश करणार आहेत. प्रवेशाची तारीख 1 जून नंतर ठरणार आहे. 30 मे रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन विखे समर्थकांचा प्रवेश आणि मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख घेणार आहेत. त्यानंतर प्रवेश सोहळा होणार आहे. विखे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. तर भाजपाला ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला मुस्लिम चेहरा मिळणार आहे.
स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची झाली गोची
आ. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. पण यावेळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना सत्तारांच्या भूमिकेमुळे मोठी लिड मिळाली आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्या पक्ष प्रवेशाला हिरवी झेंडी दाखविलेली आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनीच सत्तारांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याने स्थानिक भाजपा पुढार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. काही कार्यकर्त्यांनी मनातील भावना दानवेसमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला असता दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांची कानउघडणी करत मला पहिल्यांदा मोठी लिड दिली. त्यामुळे तुम्ही काही सांगू नका असे सांगितल्याने कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही सत्तार यांना प्रवेश दिला जात आहे. या कार्यकर्त्यांची खा. दानवेंसमोर बोलण्याची हिंमत होताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे.